देशात आर्थिक मंदी असताना, Amazon देणार 10 लाख भारतीयांना रोजगार; जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात होईल नोकरभरती
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

अ‍ॅमेझॉन (Amazon) ग्लोबलचे सीईओ जेफ बेजोस (Jeff Bezos) यांची भारत भेट हा सध्या चर्चेचा विषय आहे. आपल्या भारत भेटीत जेफ देशातील अनेक बड्या व्यक्तींना भेटले. भारतात आर्थिक मंदीची परिस्थिती असताना, ग्लोबल ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने शुक्रवारी भारतात तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे.

अशा विविध क्षेत्रांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत, देशात दहा लाख नवीन रोजगार निर्मितीची योजना आखली गेली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘अ‍ॅमेझॉनची 2025 पर्यंत भारतात दहा लाख नवीन रोजगार निर्मितीची योजना आहे.’ यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या रोजगाराचा समावेश आहे.

अ‍ॅमेझॉनने उचललेल्या या पावलामुळे माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, मनोरंजन कंटेंट तयार करणे, रिटेल, लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग इत्यादी सर्व क्षेत्रात रोजगार निर्माण होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्रमुख जेफ बेझोस यांनी बुधवारी जाहीर केले की, ते भारतात एक अब्ज डॉलर्स (7,000 कोटींपेक्षा जास्त रुपये) गुंतवणूक करणार आहेत. अ‍ॅमेझॉनच्या या योजनेनुसार कंपनी, लघु आणि मध्यम उद्योगांना ऑनलाइन बाजारात घेऊन येण्यास मदत करणार आहे. भारतात रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास उपक्रमांना प्राधान्य दिले गेले आहे. या अंतर्गत 2022 पर्यंत शहरी-ग्रामीण भागातील 40 कोटी लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. (हेही वाचा: शिख धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या आरोप लावत Amazon च्या विरोधात गुन्हा दाखल)

अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्टच्या फ्लिपकार्टवर याआधी बरीच टीका झाली आहे. कंपन्यांना मिळणाऱ्या फायद्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यात, ‘अ‍ॅमेझॉनच्या 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीचा देशाला फारसा फायदा होणार नाही’, असे मत पियुष गोयल यांनी व्यक्त केले होते. मात्र गोयल यांच्या विधानानंतर दुसर्‍या दिवशी बेझोसने 10 लाख रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली.