पती पत्नीला दुभत्या गाईप्रमाणे वागवू शकत नाही, असा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) दिला आहे. प्रेमाशिवाय पत्नीकडून पैसे घेणे देखील क्रूरता आहे. क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट नाकारणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाने जून 2020 मध्ये दिलेल्या आदेशाविरुद्ध एका महिलेच्या अपीलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
न्यायमूर्ती आलोक अराधे आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, पत्नीने पतीच्या अयशस्वी व्यवसायावर 60 लाखांपेक्षा जास्त खर्च केला. तरीदेखील तिला चांगली वागणूक दिली जात नाही. त्यामुळे तिला भावनिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. (हेही वाचा - Kerala: मदरशा शिक्षकाचे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; न्यायालयाने सुनावली 67 वर्षांची शिक्षा)
कोर्टाने आपल्या निर्णयात काय म्हटले?
उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, "पतीने तिला दुभत्या गाईसारखे वागवले आणि तिच्याबद्दल भौतिकवादी वृत्ती बाळगली हे स्पष्ट आहे," असा Bar & Bench.com चा रिपोर्ट आहे. पतीचे आपल्या पत्नीशी कोणताही भावनिक संबंध नव्हता. त्याच्या या वृत्तीमुळेच तिला मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागला. जो मानसिक क्रौर्याची कारणे तयार करण्यासाठी पुरेसा आहे. तथापी पतीने न्यायालयात सांगितले की, त्याच्या कुटुंबावर कर्ज असून तो त्याच्या पत्नीची आणि मुलीची काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्याने काम करण्याचा निर्णय घेतला आणि 2008 मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये नोकरी मिळवली.
महिलेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, तिने युएईमध्ये तिच्या पतीसाठी सलूनचे दुकान उघडले होते आणि 2012 मध्ये गुंतवणूकदार व्हिसाखाली त्याला आखाती देशात घेऊन जाण्यासाठी बराच पैसा खर्च केला होता. परंतु, वर्षभरातच तिचा नवरा भारतात परत आला.
महिलेने सांगितले की, तिने कुटुंबाचा सर्व खर्च भागवला आहे. तसेच तिच्या उत्पन्नातून चिकमंगळूरमध्ये काही जमीनही खरेदी केली आहे. अखेरीस तिच्या लक्षात आले की, ती केवळ तिच्या पैशासाठी वापरली जात आहे. त्यानंतर तिने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळत तत्पूर्वी आदेश जारी केला.