जामिया विद्यापीठामध्ये (Jamia Millia Islamia) सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (Citizenship Amendment Act) आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून (Hindu Mahasabha) सत्कार होणार आहे. हिंदू महासभेने यासंदर्भात घोषणा केली आहे. गुरुवारी जामिया विद्यापीठात सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात आंदोलन सुरू असताना या तरुणाने आपल्या जवळील पिस्तुलाने गोळी झाडत घोषणाबाजी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. या घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला होता. या तरुणाला गोळीबार करत असताना पोलिसांनी थांबवलं नाही. त्यामुळे पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेवर सर्वत्र टीका होत आहे. परंतु, आता हिंदू महासभेच्या या घोषणेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हा तरुण नथुराम गोडसेप्रमाणे खरा राष्ट्रभक्त आहे, असंही हिंदू महासभेने म्हटलं आहे. तसेच शरजील इमाम आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, शाहीन बागमधील देशद्रोही लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असं वादग्रस्त वक्तव्यही हिंदू महासभेच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. यासंदर्भातील 'टाइम्स नाऊ' या वेबसाईटने वृत्त दिलं आहे. या तरुणाला 14 दिवसांची संरक्षणात्मक कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. (हेही वाचा - दिल्ली: जामिया विद्यापीठात अज्ञाताकडून गोळीबार, एक विद्यार्थी जखमी; पहा व्हिडिओ)
Delhi: The Jamia shooter has been sent to 14-day protective custody by a local Court.
— ANI (@ANI) January 31, 2020
दरम्यान, हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे यांनी 'या मुलाचा आम्हाला अभिमान आहे, या तरुणाने देशद्रोही विचारसरणीच्या व्यक्तींना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आहे,' असं म्हटलं आहे. तसेच जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा सत्कार करण्याबरोबरच त्याला या प्रकरणात लागणाला सर्व कायदेशीर खर्च हिंदू महासभा करणार असल्याचही पांडे यांनी यावेळी सांगितलं आहे. या सर्व प्रकारामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.