Delhi Rain Update: दिल्लीत पावसाचा वेग कायम, पावसामुळे सखल भागात साचले पाणी
Rain | mage Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

गेले काही आठवडे महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजवल्यावर आता पावसाचे (Rain) तुफान दिल्लीकडे (Delhi) वळले आहे. काही दिवसांपासून दिल्लीत जोरदार पाऊस पडत आहे. आता पावसाचा वेग वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आनेक सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आजसाठी यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. तर राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये सोमवारसाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, आज दिल्लीमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीतील कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याच्या मते दिल्लीमध्ये 31 जुलै रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 43.6 मिमी पाऊस पडला होता. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सातत्याने पाऊस पडत आहे. ज्यामुळे लोकांना उन्हापासून दिलासा मिळाला. मात्र काही ठिकाणी पाणी साचल्याने समस्याही निर्माण झाली आहे. आयआयटी-दिल्ली उड्डाणपुलाखालील रस्त्याचा एक भाग गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे काल कोसळला आहे. ज्यामुळे शनिवारी परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला.

मात्र या काळात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. त्याचवेळी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी दक्षता दाखवत तातडीने वाहतूक थांबवली. तसेच वाहनांना खड्ड्याच्या दिशेने जाण्यापासून रोखले. रस्ता कोसळल्यामुळे सुमारे 10 फुटांचा खड्डा तयार झाला आहे. तर रस्त्याखालील नाल्यामुळे त्यात सतत पाणी वाहत आहे.

या दरम्यान एक दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. ती म्हणजे शनिवारी सकाळी यमुनेची पाण्याची पातळी 205.33 च्या धोक्याच्या चिन्हाच्या खाली पोहोचली आहे. दिल्लीत एक दिवस आधी प्रशासनाने पुराचा इशारा जारी केला होता. विभागाने रविवारसाठी यलो अलर्ट आणि सोमवारसाठी पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता. प्रशासन आलेल्या आपत्तीवर नियंत्रण आणण्याचे काम करत आहे. तसेच लोकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. नुकताच महाराष्ट्रात पावसामुळे अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले आहेत.