Hathras Gangrape Case: माता-बहिणींच्या स्वाभिमानाला धक्का लावणार्‍यांची गय करणार नाही, दोषींची शिक्षा भविष्यात उदाहरण सिद्ध होईल: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
सीएम योगी आदित्यनाथ (Photo Credit-PTI)

उत्तर प्रदेशामध्ये हाथरस गॅगरेप पाठोपाठ 2 अजून बलात्काराच्या घटना समोर आल्यानंतर देशभरातून योगी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उठवलं जात आहे. दरम्यान मीडीया आणि राजकीय नेत्यांनादेखील हाथरस मध्ये प्रवेश नाकारला जात असल्याने भारतभरातून युपी सरकार नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? असा सवाल विचारला जात आहे. अशावेळेस आज (2 ऑक्तोबर) युपी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर अकाऊंटवरून एक विशेष ट्वीट करण्यात आलं आहे. 'आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक माता-बहिणीच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी संकल्पबद्ध' असल्याचं सूचक ट्वीट करण्यात आलं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच 3 सदस्यीय SIT समिती नेमली असून त्यांना अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या ही चौकशी सुरू असताना त्यावर परिणाम होऊ नये म्हणून मीडियाला प्रवेशबंदी असेल असे देखील सांगण्यात आले आहे. मात्र देशभर या घटनेबद्दल रोष व्यक्त होत असताना आता मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर प्रदेशातील प्रत्येक माता-बहिणीच्या सन्मानाची आम्ही जबाबदारी घेतो. त्यांचा विकास आणि सुरक्षा करण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध आहोत. त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवणार्‍यांची गय केली जाणार नाही. त्यांना अशी शिक्षा दिली जाईल जी भषिष्यात उदाहरण सिद्ध होईल. असे सांगत त्यांनी बलात्कारींना कठोर शिक्षा करणार असल्याची पुन्हा ग्वाही दिली आहे. Hathras Gangrape: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर

ANI Tweet

दरम्यान काल राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनादेखील पीडीतेच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखण्यात आले आहे. यावेळेस राहुल गांधींसोबत धक्काबुक्की झाली. आज असाच प्रकार तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्यांसोबतही झाला आहे.त्यामुळे अनेकजण पोलिस प्रशासन आणि सरकारकडे संशयाने पाहत आहेत.

मुंबई मध्येही शिवसेनाकडून चर्चगेट परिसरात हाथरस प्रकरणी निदर्शनं सुरू झाली आहेत. तर आज सकाळी एनसीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना जर योगी आदित्यनाथ सरकारला महिलांना सुरक्षा देणं शक्य होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे.