Haryana Bypoll Results 2020: हरियाणामधील एका विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी म्हणजेच आज मतमोजणी होत आहे. हरियाणाच्या बडोदा विधानसभा सीटसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात आली होती. कृष्ण हुड्डा यांच्या मृत्यूमुळे एप्रिलमध्ये ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर भाजपचे उमेदवार योगेश्वर दत्त यांच्यासह 14 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने यावेळी इंदू राज नरवाल यांना उमेदवारी दिली आहे. तसेच इंडियन नॅशनल लोकदलाने (आयएनएलडी) जोगिंदरसिंग मलिक यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत या जागेसाठी 68.43 टक्के मतदान झालं होतं. काँग्रेसचे आमदार कृष्णा हुड्डा यांनी 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा जिंकली होती. मात्र, हुड्डा यांच्या निधनानंतर बडोदा विधानसभा जागा एप्रिलमध्ये रिक्त झाली होती. बडोदा मतदारसंघ हा काँग्रेस नेत्यांचा आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांचा गढ मानला जातो. या जागेसाठी भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी आपला मुलगा दीपेंद्र हुड्डा यांच्यासमवेत आक्रमकपणे प्रचार केला. (हेही वाचा -Uttar Pradesh By Poll Result 2020: उत्तर प्रदेशमधील 7 विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार)
त्याचवेळी, भाजपने कुस्तीगीर नेता योगेश्वर दत्त यांना उमेदवारी दिली आहे. ते सोनीपत जिल्ह्यातील भैन्सवाल कलांचे असून 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात दाखल झाले होते. ते हुड्डा यांच्यासोबतच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत सुमारे 5 हजार मतांनी पराभूत झाले होते. यावेळी भाजपने आपला मित्रपक्ष जननायक जनता पार्टीच्या (जेजेपी) पाठिंब्याने निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर जेजेपीच्या पाठिंब्याने या जागेवर दावा करीत आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बडोदा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 68 टक्के मतदारांनी येथे मतदान केले होते. या मतदारसंघात एकूण 1,80,529 नोंदणीकृत मतदार होते. त्यापैकी, 99,726 पुरुष, 80,801 महिला आणि दोन ट्रांसजेंडर चा समावेश होता.