Hardik Patel Join BJP (PC - ANI)

Hardik Patel Join BJP: पाटीदार नेता हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी आज भारतीय जनता पार्टीत (BJP) मध्ये प्रवेश केला. गांधीनगर येथील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हार्दिक पटेल म्हणाले की, आता ते देशहित आणि राज्यहिताच्या दृष्टीने आपल्या राजकीय प्रवासाची नवी सुरुवात करणार आहे. हार्दिक पटेलसोबत पाटीदार आंदोलनात त्याचे साथीदार असलेले अनेक नेतेही भाजपमध्ये दाखल झाले.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेलने घरी पूजा केली. माझ्यासाठी ही नवी सुरुवात असेल, असं ते म्हणाले. आज सकाळीच त्यांनी ट्विट केले होते की, 'राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि समाजहिताच्या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन.' (हेही वाचा - Bank Manager Shot by Terrorists: जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक टार्गेट किलिंग; काश्मिरी पंडितानंतर राजस्थानच्या रहिवासी बँक मॅनेजरची हत्या)

हार्दिक पटेल तीन वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. मात्र स्वतःकडे दुर्लक्ष होत असल्याचा आणि तरुणांना पुढे न घेतल्याचा आरोप करत 18 मे रोजी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. गुजरातमध्ये 50 ते 55 जागांवर पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. एकूण 182 जागांसह गुजरात विधानसभेत हा आकडा मोठा असून या जागांवर हार्दिक पटेलचा भाजपला फायदा होऊ शकतो. एवढेच नाही तर भाजपमध्ये येण्यापूर्वीच हार्दिक पटेल यांनी संपूर्ण गुजरातमध्ये प्रचार करणार असून दर 10 दिवसांनी जनतेला काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याचे आवाहन करणार असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, 2015 मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे प्रसिद्ध झालेले हार्दिक पटेल हा तरुणांमध्येही पकड असलेला माणूस मानला जातो. त्यामुळेच काँग्रेसने त्यांची पक्षात प्रवेश करताच प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आज अखेर हार्दिक पटेल यांनी भाजपचा भगवा हातात घेतला आहे.