जम्मू-काश्मीरमध्ये गिरीश चंद्र मुर्मू तर लडाखमध्ये आर. के. माथुर यांनी घेतली नायब राज्यपालपदाची शपथ
Photo Credit - ANI

जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि लडाख (Ladakh) या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या नव्या नायब राज्यपालांनी आज शपथ घेतली आहे. गिरीश चंद्र मुर्मू (Girish Chandra Murmu) यांनी जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली. तर आर. के. माथुर (RK Mathur) यांनी लडाखच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली आहे.

जम्मू-काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल बनणारे मुर्मू हे 1985 च्या तुकडीतील गुजरात श्रेणीचे सनदी अधिकारी आहेत. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. (हेही वाचा - जम्मू-कश्मीर आणि लद्दाख आता केंद्रशासित प्रदेश, नवे नियम लागू)

एएनआय ट्विट - 

लडाखच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतलेले आर. के. माथुर हे 1977 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. माथुर यांनी संरक्षण सचिव आणि माजी मुख्य माहिती आयुक्त ही पदे भूषविली आहेत. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी आज मुर्मू व माथुर या दोघांनाही पदाची शपथ दिली.

गेल्या महिन्यात भाजप सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले होते. या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनेसाठी 31 ऑक्टोबर हा दिवस निश्चित करण्यात आला होता.