देना बँक (Dena Bank), विजया बँक (Vijaya Bank)आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या तीन सरकारी बँकांचे विलीनीकरण होणार असल्याची घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. आता 1 एप्रिलपासून देना बँक व विजया बँक बंद होणार असून या बँकांचे ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे आता देना आणि विजया बँकेच्या खातेदारांची खाती बँक ऑफ बडोदामध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. विलीनीकरणानंतर ग्राहकांना नवीन खाते क्रमांक आणि ग्राहक आयडी क्रमांक दिला जाणार आहे.
पतपुरवठ्याचे पुनरुज्जीवन करणे आणि बँकिंग व्यवस्था सक्षम करण्यासाठी या तिन्ही बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या तिन बँकांचे विलीनीकरण झाल्यावर देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक उदयास येणार आहे. देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणामुळे विजया बँकेच्या शेअरधारकांना प्रत्येकी 1000 शेअरमागे बँक ऑफ बडोदाचे 402 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. तर देना बँकेच्या शेअरधारकांना प्रत्येकी 1000 शेअरमागे बँक ऑफ बडोदाचे 110 शेअर्स मिळणार आहेत. (हेही वाचा: बँक विलीनीकरण झाल्याने ग्राहकांवर परिणाम, या व्यवहारामध्ये होणार बदल)
सध्या 45.85 लाख कोटी रुपये व्यवसाय मूल्य असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ही पहिल्या क्रमांकावर आहे, तर 15.4 लाख कोटी मूल्य असलेली एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर या तीनही बँक एकत्र आल्यावर बँक ऑफ बडोदाचे मूल्य 15.4 लाख कोटी रुपये इतके होईल. चौथ्या क्रमांकावर आयसीआयसीआय बँक असून तिचे मूल्य 11.02 लाख कोटी इतके आहे.