Tamil Nadu Shocker: तिरुपत्तूरमध्ये मोफत साडी टोकन घेण्यासाठी जमली मोठी गर्दी, चार महिलांचा मृत्यू
Dead| Photo Credit - Pixabay

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) शनिवारी थाईपूसम (Thaipusam) सणाच्या आधी मोफत टोकन घेण्यासाठी साडीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात जमाव जमल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान चार महिलांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गुदमरून जखमी झाले, अशी बातमी एएनआयने दिली. अहवालानुसार, शनिवारी तिरुपत्तूर (Tirupattur) जिल्ह्यातील वानियामबडी (Vaniyambadi) येथील एका साडीच्या दुकानात टोकन घेण्यासाठी सुमारे 2000 महिला जमल्या असताना ही घटना घडली. प्रचंड जमावाने चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण केल्याने तब्बल 16 महिलांचा गुदमरल्याने बेशुद्धावस्था झाली.

त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे चौघांचा मृत्यू झाला. चारही मृतांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. वृत्तानुसार, तामिळनाडू पोलिसांचे एसपी बालकृष्ण घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. मोफत टोकन वाटपाची व्यवस्था करणाऱ्या खासगी फर्मचा मालक अयप्पन याला ताब्यात घेण्यात आले आहे. हेही वाचा Madhya Pradesh Crime: एका 58 वर्षीय महिलेची बलात्कारानंतर हत्या,16 वर्षीय मुलाला अटक

पोलिस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, तिरुपत्तूरच्या वानियांबडी येथे थाईपूसमच्या निमित्ताने मोफत 'वेष्टी' आणि साड्यांचे वाटप करण्यासाठी टोकन गोळा करण्यासाठी अनेक लोक जमले असताना झालेल्या चेंगराचेंगरीत चार महिलांचा मृत्यू झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांसाठी 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्या लोकांना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की थाईपूसम हा हिंदू तमिळ समुदायाकडून थाई महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जाणारा सण आहे. पोलिसांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असतानाही स्थानिक लोक बेशुद्ध झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडताना दिसले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.