Om Prakash Chautala (PC - Facebook)

Om Prakash Chautala: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणातील शिक्षेवर न्यायालय 26 मे रोजी युक्तिवाद सुनावणार आहे. राजकीय पक्षांपासून ते सर्वसामान्य जनतेच्या नजरा न्यायालयाच्या येत्या निर्णयाकडे लागल्या आहेत. सीबीआयने 2006 मध्ये गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर 2010 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. सीबीआयने 106 साक्षीदार हजर केले आणि साक्ष पूर्ण करण्यासाठी सुमारे सात वर्षे लागली. आरोपपत्रानंतर सात वर्षांनी 16 जानेवारी 2018 रोजी चौटाला यांचा जबाब नोंदवला गेला.

चौटाला यांचे भाऊ प्रताप सिंह यांच्या तक्रारीवरून 17 जानेवारी 1997 रोजी सदर डबवाली पोलीस ठाण्यात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, तपासानंतर या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा - देशात 44.77 टक्के लोक PM Narendra Modi यांच्या कामाबाबत समाधानी; Himanta Biswa Sarma आणि Pinarayi Vijayan ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री)

दरम्यान, 2019 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने चौटाला यांची 3 कोटी 68 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्ता नवी दिल्ली, पंचकुला आणि सिरसा येथील आहेत. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. चौटाला यांना जानेवारी 2013 मध्ये जेबीटी घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. गेल्या वर्षी चौटाला आपली शिक्षा पूर्ण करून दिल्लीच्या तिहार तुरुंगातून बाहेर आले होते.