West Bengal Assembly Election 2021: तिसर्‍या टप्प्यातील मतदान होण्याच्या काही तास आधी हावडा येथील TMC नेत्याच्या घरी सापडले EVM; सेक्टर अधिकारी निलंबित
EVM recovererd From TMC leader house (PC - ANI)

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. सर्व मतदान केंद्रांवर कडक सुरक्षे दरम्यान मतदान होत आहे. दरम्यान, हावडा जिल्ह्यातील उलुबेडिया उत्तर विधानसभा मध्ये टीएमसी नेत्याच्या घरातून ईव्हीएम आणि व्हीव्हीपीए ताब्यात घेण्यात आले आहे. टीएमसी नेत्याच्या घरातून मतदानाची साधने जप्त करण्यात आल्याच्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करत सेक्टर अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी टीएमसी नेत्याच्या घरी गर्दी केली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागला. तत्पूर्वी, उलबेड़िया उत्तरचे भाजपचे उमेदवार चिरन बरार यांनी दावा केला की, सेक्टर ऑफिसरने सोमवारी मध्यरात्री तृणमूल कॉंग्रेसचे स्थानिक नेते गौतम घोष यांच्या घरी ईव्हीएम आणि व्हीव्हीआयपींचा संच दिला. याबाबत माहिती मिळताच उलबेड़िया नंबर दोन ब्लॉकचे बीडीओ घटनास्थळी पोहोचले. परंतु, यावेळी स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांकडून टीएमसीवर टीका होत आहे. टीएमसीवर सर्वच पक्षांचे नेते गंभीर आरोप करीत आहेत. सध्या आरोपी अधिकाऱ्याला काढून टाकण्यात आले असून आणखी एक अधिकारी नेमण्यात आला आहे. (वाचा - Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ सह 5 राज्यांत आज विधानसभा निवडणूकीचं मतदान; दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क)

आज बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. तीन जिल्ह्यातील 31 जागांवर मतदान सुरू आहे. हावडामधील सात विधानसभा, हुगळीतील आठ आणि दक्षिण 24 परगणा मधील 16 जागांसाठी मतदान होत आहे. विधानसभेच्या 31 जागांसाठी 205 उमेदवार रिंगणात आहेत. तिसर्‍या टप्प्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या 10871 आहे. तर मतदारांची एकूण संख्या 78,52,425 आहे.