7th Pay Commission: महागाई भत्त्यात वाढ होण्याआधीच 'या' केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट
7th Pay Commission | (Photo credit: archived, edited, representative image)

7th Pay Commission: केंद्र सरकारचे कर्मचारी त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, नवोदय विद्यालय शाळेत (NVS) कार्यरत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने एनव्हीएस (Navodaya Vidyalaya School) मुख्याध्यापकांच्या वैद्यकीय दाव्याच्या भरपाईसाठी कमाल मर्यादा वाढविण्याची घोषणा केली आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक आधीच जारी केले आहे. केंद्र सरकारने एनव्हीएसच्या मुख्याध्यापकांसाठी वार्षिक मेडिकल रीइंबर्समेन्ट क्लेम मर्यादेमध्ये बदल केला आहे. सरकारी किंवा सीजीएचएस मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार केल्यास एनव्हीएस प्राचार्यासाठी सध्याची 5,000 रूपयाची मेडिकल रीइंबर्समेन्ट क्लेम मर्यादा आता 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे

यासह, केंद्र सरकारनेही एएमएकडून उपचारांसाठी वैद्यकीय मेडिकल रीइंबर्समेन्ट मर्यादा सुधारित केली आहे. एनव्हीएसचे प्राचार्य आता सध्याच्या मर्यादा 5000 रुपयांऐवजी एएमएकडून 15,000 हजार रुपयांपर्यंत मेडिकल क्लेम करू शकतात. त्याशिवाय एनव्हीएस कर्मचार्‍यांना वैद्यकीय भरपाईची जास्तीत जास्त मर्यादा संबंधित उर्वरित अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच राहतील. विशेष म्हणजे, 1 जुलैपासून एनव्हीएस मुख्याध्यापकांसाठी 7 व्या वेतन आयोग वेतन-मॅट्रिक्स अंतर्गत सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Alert! गिफ्टच्या नावाखाली SBI ग्राहकांची होतेय फसवणूक, चुकून सुद्धा करु नका 'हे' काम

याबरोबर महागाई भत्ता थकबाकी संदर्भात 26 जून रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीवर सर्व केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटीव्ह मशीनरी, केंद्रीय कर्मचार्‍यांची संघटना, तसेच वित्त मंत्रालय आणि कार्मिक विभागातील अधिकारी उपस्थित असतील. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महगाई भत्ता थकबाकीची भरपाई आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना महागाई सवलतीचा लाभ या अजेंड्यात समाविष्ट केले गेल्याची माहिती मिळत आहे.