Uday Samant | (Photo Credits: Twitter)

शेवटच्या वर्षात शिक्षण घेतल असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Exams) काही झाले तरी कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात घेण्यास राज्य सरकार इच्छुक नाही. तरीही विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) या परीक्षा सरकारने घ्याव्यात यासाठी इच्छुक आहे. असे असेल तर यूजीसीने परीक्षांबाबत गाईडलाईन्स जारी करावी, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितींची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा काळात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे आणि परीक्षांच्या मुद्द्यावरुन राजकारण करणे योग्य नाही. जर परीक्षा घेण्यासाठी यूजीसी अधिकच आग्रही असेल तर, त्यांनी त्याबाबत गाईडलाईन्स द्यावी. यात विद्यार्थ्यांना घरापासून परीक्षा केंद्रावर कसे आणले जावे? परीक्षा केंद्रात परीक्षागृहात किती विद्यार्थी बसवावेत? परीक्षेचा कालावधी कसा असावा? प्रश्नपत्रिका कशा छापल्या जाव्यात. त्यासाठी व्यक्ती काम करणार की रोबोट? याबाबतही माहिती द्यावी, असे प्रश्न उदय सामंत यांनी यूजीसीला विचारले आहेत. (हेही वाचा, NEET, JEE Main 2020 Exam Date: जेईई, नीट 2020 परीक्षा पुढे ढकलली, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहिर केले वेळापत्रक)

दरम्यान, शिक्षण विभाग, परीक्षा आणि सरकार यांबाबत टीका करणाऱ्यांना आपण उद्या (9 जुलै) प्रत्युत्तर देणार असल्याचे उदय सामंत यांनी या वेळी सांगितले. राज्यातील विविध विद्यापीठांतील कुलगुरुंनी दिलेला अहवाल, शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांची मते, टीकाकारांचे प्रश्न या सर्वांची उत्तरे देण्यासाठी उद्या दुपारी 4 वाजता आपण पत्रकार परिषद घेणार आहोत, असेही उदय सामंत या वेळी म्हणाले.