गुजरात (Gujrat) मध्ये पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा (Godhra) च्या एका शाळेत प्रिंसिपल आणि शिक्षक यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी 10 लाखांची लाच घेतली आहे. 27 विद्यार्थ्यांना नीट परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी हा आर्थिक व्यवहार झाला होता. याबाबत 9 मे दिवशी एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून या प्रकरणाचे पुढील धागेदोरे सापडले. एक संपूर्ण केंद्र यामध्ये सहभागी होते.
दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार, अज्ञाताकडून पोलिसांना टीप मिळाली की मेडिकल कॉलेज मध्ये काही गडबड होणार आहे. यानंतर 5 मे दिवशी मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस अधीक्षक हिमांशू सोलंकी यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्यांमध्ये तुषार भट्ट, शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम शर्मा, वडोदराचे शिक्षण सल्लागार परशुराम रॉय, त्याचा सहकारी विभोर आनंद आणि मध्यस्थ आरिफ वोहरा यांचा समावेश आहे. NEET UG 2024 Result: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेत 1,563 उमेदवारांना दिलेले ग्रेस मार्क्स रद्द; NTA येत्या 23 जून रोजी घेणार नवी परीक्षा .
जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गोध्रा तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार भट्ट यांच्याकडून ७ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. जय जलाराम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तुषार भट्ट यांची शहरातील NEET साठी उपकेंद्र अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पोलिस अधीक्षक सोळंकी म्हणाले, 'रॉय यांनी त्यांच्या किमान 27 विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये घेऊन परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. छाप्यादरम्यान त्याच्या कार्यालयातून आम्हाला 2.30 कोटी रुपयांचे धनादेश सापडले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या 27 विद्यार्थ्यांनी आधी पैसे भरले होते किंवा रॉय आणि इतरांना पैसे देण्याचे मान्य केले होते, त्यापैकी फक्त तीन उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. एफआयआरनुसार, परीक्षेच्या दिवशी जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी शाळेत पोहोचले आणि त्यांनी भट्ट यांची चौकशी केली. त्यांची कृती संशयास्पद वाटल्यावर, मोबाईल फोन तपासला आणि त्यांना 16 उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि परीक्षा केंद्रांची यादी सापडली, जी रॉयने त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवली होती.