Sarkari Naukri NABARD Recruitment 2020: 'नाबार्ड'मध्ये 73 पदांसाठी नोकरभरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया
Representational Image (Photo Credits: File Photo)

Sarkari Naukri NABARD Recruitment 2020: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच 'नाबार्ड'मध्ये ऑफिस अटेंडेंट (Office Attendant Posts) पदासाठी 73 जागांची भरती निघाली आहे. तरुणांना नाबार्डसोबत काम करण्याची ही चांगली संधी आहे. ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2020 आहे. विशेष म्हणजे या पदासाठी ग्रॅज्युएट तसेच त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

नाबार्ड अंतर्गत ऑफिस अटेंडेंट पदासाठी घेण्यात येणारी ही पदभरती ग्रुप 'सी' दर्जाची आहे. या पदाच्या एकूण 73 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. जे उमेदवार दहावी पास झालेले आहेत, असे सर्व उमेदवार या पदासाठी अर्ज भरण्यास पात्र असणार आहेत. यासाठी अर्जदाराचं वय कमीत-कमी 18 वर्ष असले पाहिजे. तसेच 1 डिसेंबर 2019 पर्यंत उमेदवाराचं वय 30 वर्षाच्या आत असणं आवश्यक आहे. (हेही वाचा  - DRDO MTS Recruitment: 'डीआरडीओ'मध्ये 1,817 पदांसाठी नोकरभरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज)

निवड प्रक्रिया -

या जागेसाठी निवड प्रक्रिया पहिल्या 2 टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांच्या भाषेची चाचणी होईल. या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. सर्वात पहिली चाचणी ही 120 गुणांची असणार आहे. यात इंग्लिश, जनरल अवेअरनेस, अंक गणिताशी संबंधित प्रश्न असणार आहेत.

मुख्य परीक्षा -

प्राथमिक चाचणीत उत्तीर्ण होणारे उमेदवार मुख्य परीक्षा देण्यास पात्र असतील. मुख्य परीक्षेत 150 गुणांचे प्रश्न विचारले जातील. यात प्राथमिक स्तरावरील प्रश्न, तसेच स्वाभाविक कल, नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य, सामान्य जागृकता, इंग्रजी भाषा याच्याशी संबंधित प्रश्न असतील. यासाठी 150 गुणांच्या परीक्षेसाठी 2 तासाचा वेळ दिला जाणार आहे.

उमेदवार या परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत देऊ शकतात. उमेदवारांना या परीक्षेसाठी 450 रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय एससी?एसटी/ पीडब्ल्यूडी/ वर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 50 रुपये असणार आहे. तुम्ही www.nabard.org या संकेतस्थळावर जाऊन ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज करू शकता.