Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

यंदाची JEE (Main), 1 सप्टेंबर 2020 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये होणार आहे व NEET (UG), 13 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे. आता या परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त निवेदनात जाहीर केले आहे की, सप्टेंबर 2020 मध्ये जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना, मुंबई उपनगरातील विशेष उपनगरीय लोकल सेवेद्वारे प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी याबाबत परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

या परिपत्रकामध्ये म्हटले आहे, ‘गृह मंत्रालय, भारत सरकार कडून मिळालेल्या परवानगीने, सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात येणारी जेईई आणि नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी नेटवर्कवर उपनगरी सेवा लोकलने प्रवास करण्यास परवानगी आहे. या लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी जेईई आणि एनईईटी देणाऱ्या उमेदवारांकडे अ‍ॅडमिट कार्ड असणे बंधनकारक आहे. यासाठी स्टेशनमधील सुरक्षा अधिका्यांना योग्य सूचना केल्या आहेत.’ यामध्ये पुढे म्हटले आहे. ‘त्याकरिता महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील.’ (हेही वाचा: लाखो विद्यार्थ्यांनी 24 तासांत अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड याची अर्थ विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा हवी' - केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल)

पियुष गोयल ट्वीट -

तसेच इतरांनी स्टेशनवर गर्दी करू नये, प्रवाशांनी प्रवास करताना कोरोना नियमांचे पालन करावे. कोणत्याही अफवा किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून JEE (Main) आणि NEET (UG), परीक्षा ज्या पूर्वी जुलै महिन्यात होणार होत्या, त्या आता पुढे ढकलून सप्टेंबर 2020 मध्ये आयोजित केल्या आहेत. यंदा जेईई (मुख्य) साठी 8.58 लाख आणि नीटसाठी 15.97 लाख उमेदवारांची नोंदणी झाली आहे.