महाराष्ट्रात कोविड 19 जागतिक महामारीचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवरही झाला आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता आता आगामी शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय आणि शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेणार्यांच्या फीमध्ये कपातीचा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांना आता शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात 16,250 रूपयांची सूट मिळणार आहे. दरम्यान या निर्णयाची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात अंदाजे 20 हजार जणांना त्याचा फायदा मिळू शकतो अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये काल (24 जून) राज्यामधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, संस्था यांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळेस चर्चा करताना कोविड संकट काळात विद्यार्थी महाविद्यालयात न येता घरूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्यामुळे ग्रंथालय, जिमखाना यांचा वापर होत नाही परिणामी ज्या सुविधा विद्यार्थी घेत नाही त्याचे शुल्कही घेऊ नका असा निर्णय झाला आहे. नक्की वाचा: 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून जास्त गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाख रुपयांचे अनुदान- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर @CMOMaharashtra उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारचा शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कात सुमारे ₹१६२५० (अंदाजे २५%) सूट देण्याचा निर्णय.२००००+ विद्यार्थ्यांना होणार लाभ.
— Uday Samant (@samant_uday) June 24, 2021
दरम्यान कालच्या बैठकीमध्ये मुंबईच्या माटुंगा भागात असलेल्या व्हीजेटीआय येथील मुलींचे वसतीगृह बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यास मातोश्री नाव देण्यास मान्यता देण्यात आली. कंत्राट तत्त्वावर आणि स्वतःच्या निधीतून शिक्षक आणि शिक्षकेतर पदं भरण्यास मानयता देण्यात आली.