सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत Google ची भागीदारी; गुगल क्लासरुम सुरु करणारे Maharashtra ठरले देशातील पहिले राज्य
Online Education (Photo Credit : Pixabay)

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने (Google)  भागिदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे. जी स्वीट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गुगलमुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना, उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल स्वीट च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. (हेही वाचा: नव्या शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी; कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर)

गूगल क्लासरूम हे जी स्वीट फॉर एज्युकेशन मधील एक सोपे पण शक्तिशाली साधन असून, जे शिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यास, पुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात मदत करेल. , तसेच वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास मदत करते. तर जी स्वीट हे जीमेल, डॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूमसह परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संच आहे. हे कोठेही, केव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम करेल.