
महाराष्ट्रामध्ये एसएससी, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल लागल्यानंतर आता 11वी प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. 11वी प्रवेशासाठी केंद्रीभूत ऑनलाईन पद्धती राबवली जात आहे. पण अजूनही 11 हजार 930 विद्यार्थ्यांचे अर्ज भरून पूर्ण झालेले नाहीत. 30 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी फॉर्मचा पार्ट 2 भरण्यास मुदत देण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर मध्ये ही ऑनलाईन 11वी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. 27 जुलै ही यापूर्वीची फॉर्मचा पार्ट 2 भरण्याची मुदत होती. ती वाढवून 30 जुलै करण्यात आली आहे. 28 जुलैला तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर करण्यात आली आहे. पण अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म्स नीट भरलेले नसल्याने त्यांना काही दिवसांची मुदतवाढ दिली आहे. हे देखील नक्की वाचा: FYJC Admission 2022-23 चे संपूर्ण वेळापत्रक इथे घ्या जाणून.
11thadmission.org.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज दोन टप्प्यात भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 3 ऑगस्टला विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंती क्रमानुसार कॉलेजसाठी प्रवेश जाहीर केले जाणार आहेत. त्यानंतर 6 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करून संबंधित कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर 7 ऑगस्टला दुसर्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी अपडेट केली जाणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 2 मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार आहेत. 22जुलैपासून फॉर्मचा पार्ट 2 भरता येणार आहे. या पसंतीक्रमावर कॉलेजमधील प्रवेश ठरणार आहेत. यंदा आयसीएसई बोर्डाचा महाराष्ट्र विभागाचा निकाल 100% लागला आहे. तर एसएससी बोर्डाचा यंदाचा दहावीचा निकाल 96.94% लागला आहे. सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल देखील यंदा 94.40%लागला आहे. त्यामुळे 11वी प्रवेशासाठी मोठी चुरस बघायला मिळेल.