Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणूक आणि मुंबई (Mumbai University) विद्यापीठातील काही विभागांच्या परीक्षांच्या तारखा (Mumbai University Examinations Dates) समांतर येत आहेत. त्यामुळे संभाव्य गोंधळ आणि विद्यार्थ्यांची अडचण ध्यानात घेऊन या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. हा निर्णय केवळ निवडणूक कालावधीत येणाऱ्या परीक्षांसाठीच लागू असणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई विद्यापीठाच्या बीए, बीकॉम विभागाच्या परीक्षा निवडणूक काळात येत आहेत. या परीक्षा 22 एप्रिल, 23 एप्रिल, 24 एप्रिल, 29 एप्रिल, आणि 30 एप्रिल रोजी या परीक्षा येत आहेत. तर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर,ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये त्याच कालावधीत मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, Maharashtra MBA CET 2019 Hall Ticket: अधिकृत संकेतस्थळ @dtemaharashtra.gov.in वर महाराष्ट्र एमबीए सीईटीचे हॉल तिकीट उपलब्ध)
दरम्यान, बदलत्या वेळापत्रकाची माहिती विद्यार्थांना देण्यात येणार आहे. तसेच, नवे वेळापत्रक मंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठ परीक्षा विभागाने दिली आहे. तर, दुसऱ्या बाजूला औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 18 आणि 23 एप्रिल रोजीच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत.