अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अल्पसंख्याक विकास समितीच्या काही सदस्यांनी सूचना केल्यानुसार जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत अशा संस्थांमधील शाळांची 12 वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत. जेथे तातडीने मान्यता देणे शक्य आहे, अशा शाळांमधील वर्गवाढीस मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजासंदर्भात शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
#अल्पसंख्याक समाजातील मुलींचे #शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अल्पसंख्याक विकास समिती सदस्यांच्या सूचनेनुसार ७वी पर्यंत शाळा असणाऱ्या संस्थांमधील शाळांची १२वी पर्यंत #वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शिक्षण मंत्री @VarshaEGaikwad यांनी दिले. pic.twitter.com/OdNSTTRkEx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 18, 2022
मराठी प्रमाणेच उर्दू भाषिक शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून द्वैभाषिक पुस्तके लागू करण्याची सूचनाही करण्यात आली होती, त्यानुसार पहिल्या इयत्तेत उर्दू आणि इंग्रजी अशी द्वैभाषिक पुस्तके प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावीत, असे निर्देश गायकवाड यांनी दिले. अल्पसंख्याक संस्थांमधील मान्यताप्राप्त रिक्त पदांवर शिक्षक भरती, शिक्षकांचे समायोजन याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, उपसचिव समीर सावंत, शिक्षण संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक के.बी.पाटील, विवेक गोसावी आदी उपस्थित होते.