CBSE Board Exams 2020 Update: 10वी, 12 वीच्या स्थगित केलेल्या 29 विषयांच्या परीक्षांबाबत लॉकडाऊन संपल्यानंतरच विचार होणार!
CBSE 10th 12th Board Exam | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

CBSE Class 10, 12 Examination 2020 Update: भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटादरम्यान स्थगित करण्यात आलेल्या सीबीएसई शिक्षण मंडळाच्या 10 वी, 12 वी च्या परीक्षांबद्दल सध्या पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. अशामध्ये आता या परीक्षांच्या तारखांवरून काही बातम्या समोर यायल्या लागल्या होत्या मात्र बोर्डाच्या परीक्षांचं पुढे काय होणार? हे लॉकडाऊन नंतरच ठरवलं जाईल अशी माहिती आज (29 एप्रिल) CBSE मंडळाने दिलेल्या परिपत्रकातून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान देशभरात सीबीएसईच्या 29 विषयांच्या परिक्षा स्थगित झाल्या आहेत.

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल दिवशी मंडळाकडून परिक्षा स्थगित करण्यात आल्या असून त्या कोरोना व्हायरस लॉकडाऊन संपल्यानंतर घेण्याबाबत विचार केला जाईल असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. अजूनही सीबीएसई या परिपत्रकावरच ठाम आहे. त्यामुळे 3 मेनंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा लॉकडाऊन बाबतचा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नवं वेळापत्रक आणि परीक्षांच्या तारखांबद्दल माहिती दिली जाईल.  CBSE पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठवणार; सरकारने दिले आदेश.

CBSE शिक्षण मंडळाची माहिती

दरम्यान ANIशी बोलताना दिल्ली हिंसाचारादरम्यान परिक्षांना मुकलेल्या विद्यार्थ्यांनादेखील लवकरच पुन्हा परीक्षा देता येऊ शकते का? याबाबतही प्रयत्न केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षण मंडळाकडून नवं वेळापत्रक किंवा तारखांबद्दल माहिती दिली जाऊ शकत नाही.

भविष्यात शिक्षण मंडळाकडून किमान 10 दिवस आधी विद्यार्थ्यांना पूर्वसूचना दिली जाईल त्यानंतरच परीक्षा घेतल्या जातील असा विश्वास देण्यात आला आहे.