Students | Twitter

सीबीएसई बोर्डाची (CBSE Board Exam 2023) 10वी, 12वी ची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. देशभरामध्ये विविध केंद्रांवर आजपासून विद्यार्थी परीक्षेला सामोरं जाणार आहेत. आजपासून सुरू झालेली 10वी ची परीक्षा 12 मार्चला संपणार आहे तर 12वी ची परीक्षा 5 एप्रिलला संपणार आहे. यंदा 10वी साठी अंदाजे 21,86,940 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यापैकी 9,39,566 मुली आणि 12,47,364 मुलं आहेत. 12वी साठी 16,96,770 विद्यार्थी आहेत त्यापैकी 7,45,433 मुली आणि 9,51,332 मुलं आहेत.

यंदा कोविड 19 संकटानंतर पहिल्यांदा विद्यार्थी पूर्वीप्रमाणे बोर्ड परीक्षेला सामोरं जाणार आहेत. त्यांना संपूर्ण अभ्यासक्रमावर लेखी स्वरूपात परीक्षा द्यावी लागणार आहे. मागील वर्षी दोन सेमिस्टर मध्ये बोर्डाची परीक्षा घेऊन एकत्रित निकाल जाहीर करण्यात आला होता. नक्की वाचा: CBSE Time Table: सीबीएसई बोर्डाचं दहावी,बारावीच्या लेखी परीक्षेचं वेळापत्रक जारी; 15 फेब्रुवारीपासून एक्झामला सुरूवात .

परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी काय लक्षात ठेवाल?

  • बोर्ड परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना जाड कपडे, खूप दागिने घालून जाण्यास मज्जाव आहे. एम्ब्रॉडरी असलेले, फूल स्लिव्ह्जचे किंवा साडी परिधान करून येण्यास विद्यार्थ्यांना मज्जाव असेल. शाळेचा गणवेश हाच विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड असणार आहे. अन्य फॉर्मल ड्रेसमध्ये जाण्यास बंदी असेल.
  • परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 1 तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचणं आवश्यक आहे. सकाळी 10 वाजता परीक्षा केंद्रांचे दरवाजे बंद केले जातील.
  • विद्यार्थ्यांना त्यांचं अ‍ॅडमीट कार्ड देखील सोबत बाळगणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नसेल.
  • परीक्षेच्या विषयांनुसार पेन आणि रंग विद्यार्थी घेऊन जाऊ शकतील पण अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाऊ शकत नाहीत.
  • सीबीएसई बोर्डाची परीक्षा 10.30 ते 12.30 /1.30 या दरम्यान होणार आहे. विषयानुसार परीक्षेचा वेळ असणार आहे.

दरम्यान परीक्षेचं वेळापत्रक नीट पाहून त्यानुसार तयारी करा म्हणजे परीक्षेच्या तारखेत, वेळेत विद्यार्थ्यांचा घोळ होणार नाही. सोशल मीडीयावर परीक्षेबाबत खोट्या बातम्या पसरवू नका तसेच सूत्रांशिवाय दिलेल्या माहितीवर विश्वासही ठेवू नका असं आवाहन बोर्डाकडून पालक, विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे.