Mukhtar Ansari ED Raid: मुख्तार अन्सारीवर ईडीची कारवाई; दिल्ली-लखनौ-मऊसह 11 ठिकाणी छापेमारी
Mukhtar Ansari (PC - Facebook)

Mukhtar Ansari ED Raid: तुरुंगात असलेला बाहुबली नेता मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) आणि त्याच्या निकटवर्तीयांवर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (Ed) गुरुवारी छापे टाकले. ईडीने 11 ठिकाणी छापे टाकले आहेत. मुख्तार अन्सारीचा भाऊ आणि बसपा खासदार अफजल अन्सारी हेही ईडीच्या रडारवर होते. त्याच्या दिल्लीतील निवासस्थानावरही एजन्सीने छापा टाकला.

दिल्लीशिवाय लखनऊ, मऊ, गाझीपूर येथेही एजन्सी छापे टाकत आहे. ईडीचे अधिकारीही मुख्तार अन्सारीच्या वडिलोपार्जित निवासस्थानी पोहोचले आहेत, जो बराच काळ त्याचा बालेकिल्ला होता. येथून ते मुहम्मदाबादमध्ये आपले साम्राज्य चालवत असे. एकेकाळी मुहम्मदाबाद येथील अन्सारीच्या घरी जायलाही पोलीस घाबरायचे. अन्सारी बंधूंव्यतिरिक्त ईडीच्या रडारवर विक्रम अग्रहरी आणि गणेश मिश्रा यांचाही समावेश आहे. खान बस सर्व्हिसच्या मालकावरही ईडीने छापा टाकला आहे. (हेही वाचा - Fake News YouTube Channels Blocked: मोदी सरकारचा फेक न्यूजवर 'Digital Strike'; 8 यूट्यूब चॅनल ब्लॉक)

ईडीच्या पथकाने सीआरपीएफ, मिश्राबाजारचे ज्वेलरी व्यापारी विक्रम अग्रहरी, खान ट्रॅव्हल्सचे मुस्ताक खान, रौजा येथील गणेश दत्त मिश्रा आणि अफजल अन्सारीच्या मुहम्मदाबाद येथील फाटक यांच्या घरी सकाळी 7 वाजता छापा टाकला. घराच्या मुख्य गेटपासून रस्त्यापर्यंत कडेकोट बंदोबस्त दिसत होता. छाप्यांबाबत अद्याप ईडीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, या परिसरात छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बाहुबली डॉन मुख्तार अन्सारी विरुद्ध ईडीने जुलै 2021 मध्ये मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. मुख्तारने एका सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप आहे. यानंतर, ते एका खाजगी कंपनीला 7 वर्षांसाठी वार्षिक 1.7 कोटी या दराने भाड्याने देण्यात आले. मुख्तारचे भाऊ आणि मुलाचे या कंपनीशी संबंध असल्याचा आरोप होता. प्रकरण उघडल्यावर ईडीने मुख्तार, अफझल आणि इतर अनेकांना आरोपी बनवून गुन्हा दाखल केला. 9 मे रोजी अफजल अन्सारीची ईडीच्या प्रयागराज पथकाने 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली.