करिअर (Photo Credits: Facebook)

आजकाल करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्याबद्दल नीटशी माहिती नसल्याने पालक, विद्यार्थी या पर्यायांकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि मग नेहमीच्या पठडीतले कोर्सेस करिअरसाठी निवडले जातात. पण जर तुम्हाला अभ्यासात फार रुची नसल्यास तुम्ही या काही पर्यायांची करिअर म्हणून निवड करु शकता. त्याचबरोबर हे कोर्सेस केल्याने तुम्हाला दररोज ऑफिसलाही जावे लागणार नाही. आणि तुम्ही तुमच्या आवडीचे काम करुन भरपूर पैसे कमावू शकता. तर एक नजर टाकूया अशा काही खास करिअर ऑप्शन्सवर...

ट्रॅव्हल अॅंड टुरिझम

तुम्हाला फिरायला आवडतं का? मग हा करिअर ऑप्शन तुमच्यासाठी योग्य आहे. देश-विदेशातील संस्कृती, इतिहास याबद्दल आवड असल्यास ट्रॅव्हल आणि टूरिज्मचा कोर्स तुम्ही जरुर करु शकता. या कोर्समुळे पैसे कमावण्यासोबतच फिरण्याचीही संधी मिळेल. १२ वी किंवा ग्रॅज्युएशननंतर तुम्ही ट्युरिजम कोर्स करुन चांगले पैसे कमावू शकता. देशात अनेक कॉलेजेसमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे.

योगामध्ये करिअर

गेल्या काही वर्षांपासून योगाबद्दल सामान्यांमध्ये चांगलीच जागरुकता निर्माण झाली आहे. तरुणाईमध्येही याचे क्रेझ दिसून येते. मात्र यासाठी तुम्हाला विधीवत प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्याचबरोबर यासाठी खूप सरावाचीही गरज आहे. १२ वी नंतर कोर्स करुन तुम्ही हळूहळू पुढे जावू शकता. कोर्स प्रतिष्ठीत संस्थेतून करणे, अत्यंत गरजेचे आहे.

आजकाल शाळा, कॉलेजेसमध्येही योगा क्लासेस आयोजित केले जातात. त्याचबरोबर तुमच्याकडे पर्सनल क्लासेसचाही पर्याय आहे.

जिम इंस्ट्रक्टर

आजकाल फिटनेसबद्दल लोक खूप जागरुक झाले आहेत. त्यामुळे जिम इंस्ट्रक्टर हा करिअरचा उत्तम पर्याय होऊ शकतो. मात्र यासाठी तुम्हाला कठोर मेहनत करायला हवी. ६-८ महिन्यांचा कोर्स केल्यानंतर तुम्ही जिम ट्रेनर म्हणून काम करु शकता.

इंटिरिअर डिजायनिंग

ड्रॉईंग, पेटींगची आवड असल्यास आणि क्रिएटीव्ही असल्यास तुम्ही इंटिरिअर डिजायनिंगकडे करिअर ऑप्शन म्हणून पाहू शकता. इंटिरिअर डिजायनिंगचा डिप्लोपा किंवा शॉर्ट टर्म कोर्स करुन तुम्हाला लवकरात लवकर कमाईची संधी मिळू शकते. त्यानंतर तुम्ही स्वतः या कोर्सचे क्लासेस घेऊ शकता.

टी टेस्टिंग

चहाप्रेमींसाठी हा एक जबरदस्त ऑप्शन आहे. टी टेस्टिंगमध्ये तुम्ही तुमचे करिअर करु शकता. या क्षेत्राबद्दल खूप कमी लोकांना माहित असल्याने यात करिअरच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.

यात तुम्हाला चहाची चव चाखून त्याबद्दल सांगायचे असते. चहा अजून चांगला कसा बनवता येईल, याबद्दल सल्ला द्यायचा असतो. इतर कंपन्यांच्या चहासोबत तुलनात्मक रिपोर्ट द्यावा लागतो. त्यानंतर चविष्ट चहा बाजारात विकण्यासाठी उपलब्ध होतो.

पेट ग्रुमिंग

तुम्हाला प्राणी खूप आवडतात का? त्यांना खेळवायला, त्यांची काळजी घ्यायला आवडते का? मग हा पर्याय खास तुमच्यासाठीच आहे. प्रोफेशनल पेट ग्रुमर बनण्यासाठी विशिष्ट कोर्स व ट्रेनिंग पूर्ण करावी लागेल. ग्रुमिंग कोर्समध्ये कुत्रे, मांजरी, ससा यांसारखे पाळीव प्राण्यांचे ग्रुमिंग व स्टायलिंग करण्याबद्दल ट्रेनिंग दिली जाते. त्याचबरोबर हेअर ड्रेसिंग आर्टबद्दल देखील सांगितले जाते. त्यानंतर तुम्ही चांगल्या ग्रुमिंग इंस्टिट्यूटमध्ये नोकरी करु शकता. किंवा पेट ग्रुमिंगचा व्यवसायही करु शकता.

स्पा मॅनेजमेंट

आजकालच्या धावपळीच्या जगात स्पा करणे अनेकांना पसंत असते. पर्यटनस्थळांवर तर याचे चांगलेच प्रस्थ आहे. स्पा मॅनेजमेंट कोर्समध्ये स्पा संबंधित सर्व माहिती दिली जाते. तरुणांसाठी हा करिअरचा एक उत्तम पर्याय आहे.

हॉटेल मॅनेजमेंट

तुम्ही स्वयंपाकघरात अधिक रमता का? नवनवे पदार्थ बनवायला तुम्हाला अधिक आवडते का? मग १२ वी नंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्सचा पर्याय निवडू शकता. हा कोर्स करुन तुम्ही देश-विदेशातील हॉटेलमध्ये नोकरी करुन चांगले पैसे कमावू शकता.