Karnataka Shocker: सलग चौथी मुलगी झाल्याने एका व्यक्तीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना कर्नाटकात घडली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बेंगळुरूपासून 90 किमी अंतरावर असलेल्या सेत्तीहल्ली येथे एका महिलेने आपल्या चौथ्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर या महिलेच्या 34 वर्षीय पतीने गळफास लावून घेतला. लोकेश असे मृताचे नाव असून त्याचा विवाह 9 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील पुंगानूर येथील महिलेशी झाला होता. मृताच्या आईला लोकेशचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
सेत्तीहल्लीच्या रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, लोकेशला अनेक दिवसांपासून नैराश्याने ग्रासले होते. तीन वर्षांपूर्वी तिसरी मुलगी झाल्याने त्याने आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला समजावून सांगून प्रकरण शांत केले होते. अगदी अलीकडे लोकेशची पत्नी पुन्हा गरोदर राहिल्यानंतर तिला मुलगा होईल अशी त्याची अपेक्षा होती. मात्र चौथी मुलगी झाल्यानंतर लोकेश अस्वस्थ झाला आणि त्याने आत्महत्या केली. (हेही वाचा - महिलेवर सोशल मीडीयात मैत्री केलेल्या तरूणीकडून Sex, लग्न करण्याचा दबाव; पोलिसांनी ठोकल्या बेड्या)
पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, लोकेशची आई तिच्या दुसऱ्या मुलासोबत शेजारच्या घरात राहते. रविवारी ती त्याला जेवण देण्यासाठी गेली असता तिला लोकेश छताला लटकलेला दिसला. पोलिसांनी सांगितले की, लोकेशचे कोणाशीही वैर नव्हते आणि तो कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटातून जात नव्हता. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्याचवेळी लोकेशच्या मृत्यूने परिसरातील लोकांना धक्का बसला आहे.