घरगुती गॅस सिलिंडर (Domestic Gas Cylinder) 52 रुपयांनी स्वस्त (Price Decrease) झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बिगर सबसिडी असलेला स्वयंपाकाच गॅस सिलिंडर (14.2 किलोग्रॅम) 52.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे 893.50 रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर मार्च महिन्यात 841 रुपयांना मिळणार आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात 144.50 रुपयांची वाढ झाली होती. मात्र, आजपासून घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर लागू झाले आहेत.
घरगुती सिलिंडरच्या किमती मार्च महिन्यात कमी होतील, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मागील महिन्यात सांगितलं होतं. फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती बदलल्याने सिलिंडरच्या किमतीत घसरण झाली आहे. (हेही वाचा - गिरणी कामगारांच्या 3 हजार 894 घरांसाठी आज निघणार सोडत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा)
मार्च महिन्यात गॅस कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचे (19 किलोग्रॅम) दर 84.50 रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना केवळ 1465.50 रुपयांत सिलिंडर मिळणार आहे. तसेच 5 किलोग्रॅमचा छोटा सिलिंडरदेखील 18.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे हा सिलिंडर ग्राहकांना केवळ 308 रुपयांत मिळणार आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सरकार सबसिडी देते. त्यामुळे ग्राहकांना हा सिलिंडर 515 रुपयांना मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.