लहानपणी जवळजवळ प्रत्येकालाच पेन्सिल अथवा खडे खाण्याची सवय असते. क्वचित ही सवय वाढून इतर गोष्टींमध्ये परिवर्तीत होते. मात्र राजस्थानच्या बुंदी (Bundi) जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या पोटातून चक्क लोखंडी खिळे, तुकडे आणि वायर बाहेर काढण्यात आली आहे. भोला शंकर (Bhola Shankar) असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांचे वय 42 वर्षे आहे. बुंदी सरकारी हॉस्पिटल (Bundi Government Hospital) मधील डॉ. अनिल सैनी यांनी या व्यक्तीवर उपचार केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भोला शंकर गेल्या काही दिवसांपासून पोटात दुखत आहे अशी तक्रार घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये आला. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून एक्सरे काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सीटी स्कॅनही करण्यात आले. तेव्हा दिसणारा रिझल्ट पाहून डॉक्टर अवाक झाले. भोलाच्या पोटात लोखंडी खिळे, लोखंडाचे तुकडे आणि तारा आढळून आल्या. डॉक्टरांनी ताबडतोब त्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. (हेही वाचा: आशिया खंडातील सर्वात जाड महिलेवर मुंबई येथे शस्त्रक्रिया; 300 किलोवरून 86 किलो झाले वजन)
ऑपरेशनद्वारे भोलाच्या पोटातून 116 लोखंडी खिळे, वायर काढण्यात आले. साधारण 6.5 सेमीचे हे खिळे आहेत. मात्र या लोखंडी वस्तू भोलाच्या पोटात कशा गेल्या याबाबत त्यालादेखील काहीच माहिती नाही. या रुग्णाची मानसिक स्थिती खराब आहे, त्यामुळे त्याला अशा वस्तू खाण्याची सवय लागले असावी असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मानसिक परिस्थिती खराब झाल्याने भोलाला त्याची नोकरी सोडावी लागली होती, सध्या तो माळी म्हणून काम करत आहे. दरम्यान, याआधी जुलै 2017 मध्ये, फरिदाबाद हॉस्पिटलमध्ये बद्रीलाल (56), या बुंदी येथील व्यक्तीच्या पोटातून 150 सुया आणि खिळे काढण्यात आले होते.