Photo Credit- Pixabay

Delhi School: बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर दिल्ली महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी (एमसीडी) शाळांना नोटीस (Delhi Bangladeshi Migrants)पाठवली आहे. 18 डिसेंबर रोजी एमसीडीने शाळा व्यवस्थापनाला बांगलादेशी विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले. अशा स्थलांतरितांचे जन्म प्रमाणपत्र बनवू नये, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, जर बांगलादेशी स्थलांतरितांनी बेकायदेशीर बांधकामे केली असतील तर ती पाडण्यात यावीत, असे एमसीडीने म्हटले आहे. एमसीडीने 31 डिसेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

1. पडताळणी मोहीम चालवा

दिल्लीतील बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर एमसीडीने शनिवारी बैठकही घेतली आहे. एमसीडीचे उपायुक्त बीपी भारद्वाज म्हणाले की, शिक्षण विभागाने बेकायदेशीर बांगलादेशींची ओळख पटवून त्यांना पालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलावीत. बांगलादेशी विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी एक पडताळणी मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

2. पूर्वी जारी केलेले जन्म प्रमाणपत्र तपासा

एमसीडीने आरोग्य विभागाला पाठवलेल्या नोटीसमध्ये बेकायदेशीर बांगलादेशींचे जन्म प्रमाणपत्र बनवू नये असे आदेश दिले आहेत. ज्या बांगलादेशींची जन्म प्रमाणपत्रे आधीच जारी केली गेली आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी एक पडताळणी मोहीमही चालवली जावी. नवीन अर्जांची गांभीर्याने तपासणी करून मगच ते स्वीकारण्याचे आदेश सर्व विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले.

जुन्या नोंदींच्या पडताळणीसाठी तक्रारीच्या आधारे पडताळणीही करावी. एखाद्या व्यक्तीने चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र बनवले असल्याची माहिती पोलीस किंवा इतर एजन्सीने दिली तर ते रद्द करावे.

3. अतिक्रमण काढण्याचे आदेश

बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांनी केलेले अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे, असे एमसीडी उपायुक्तांनी आदेशात म्हटले आहे. हा आदेश MCD च्या सर्व क्षेत्रांसाठी आहे. त्यांनी सर्व संबंधित विभागांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. मतदार यादीत घुसखोरांची नावे समाविष्ट केली जात असल्याचा आरप भाजपकडून केला जात आहे. बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या समुदाय हा निवडणुकीत मोठा मुद्दा राहिला आहे. भाजपने आम आदमी पक्षावर (आप) अवैध बांगलादेशी घुसखोरांचा मतदार यादीत समावेश केल्याचा आरोप केला होता. आपचे संजय सिंह यांनी भाजपचे केंद्र सरकार अवैध स्थलांतरितांना सुरक्षा देत असल्याचा आरोप केला होता.