Delhi Fire: अनाज मंडी आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना केजरीवाल सरकारकडून 10 लाखांची मदत
Delhi Chief Minister Arvind Kejriwal (PC- ANI)

Delhi Fire: दिल्लीतील अनाज मंडी परिसरात झालेल्या भीषण अग्नितांडवात 43 जाणांचा बळी गेला आहे. सध्या पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. याठिकाणाहून 56 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या आगीत मृतांच्या कुटुंबीयांना केजरीवाल सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयात गेले. यावेळी त्यांनी मृताच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून 10 लाख रुपये तसेच जखमींना 1 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.

दरम्यान, दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिवारी यांनी घटनेबद्दल दु: ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली. याशिवाय जखमींना 25 हजार रुपये देणार असल्याचे सांगतले. (हेही वाचा - नवी दिल्लीतील अनाज मंडी येथे आगीचे तांडव; 43 जणांचा मृत्यू)

नवी दिल्लीच्या झाशी चौकातील अनाज मंडी येथे 3 कारखान्यांना आग लागली. अद्याप आगेची नेमके कारण स्पष्ट झाले नाही. 3 कारखान्यांना एकाचवेळी आग लागल्याने आगीचे स्वरुप मोठे होते. संबंधित कारखान्यांमध्ये कागदाचे बॉक्स बनवण्याचे काम होत होतं. त्याच कारखान्याला ही आग लागली. कागदामुळे आगीची तीव्रता अधिक होती.