देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउन येत्या 17 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केला आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा 37,336 वर पोहचला आहे. तर बळींचा आकडा 1218 झाला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. त्याचसोबत देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने 284 जिल्हे हे ऑरेंज झोन मध्ये तर 319 जिल्हे हे ग्रीन झोनमध्ये आणि 130 जिल्हे हे रेड झोन मध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र मुंबईत देशभरातील 20 टक्के कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणांची चिंता अधिकच वाढली आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, संक्रमित जिल्ह्यांची संख्या वाढल्याने ती एक चिंतेची बाब आहे. 18 एप्रिल ते 1 मे दरम्यान, कोविड-19 प्रभावित जिल्ह्यांची आकडेवारी 406 वरुन 475 वर आली आहे. मात्र रेड झोनमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. 1 मे पर्यंत कोरोनाच्या हॉटस्पॉटच्या संख्येत घट होत 170 वरुन आता 130 वर आली आहे.(Coronavirus: आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी नौदलाच्या 14 युद्धनौका सज्ज)
पंधरा दिवसात ग्रीन झोनची संख्या 353 वरुन 319 वर आली आहे. जर एखाद्या जिल्ह्यात गेल्या 21 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून न आल्यास त्याला ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. सरकारने जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी करण्यापूर्वी विविध गोष्टींबाबत काळजी घेत निर्णय घेतला आहे. सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचसोबत नागरिकांना सुद्धा घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी नवी मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर केली असून नॉन कोविड ठिकाणी लॉकडाउनचे नियम शिथिल केले आहेत.