Corona Villager in Sitapur district. (Photo Credit: ANI)

'Corona' Village: कोरोना व्हायरसने जगभरात 30 हजारहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. भारतालादेखील कोरोनाने विळखा घातला आहे. देशात आतापर्यंत 1हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोरोनामुळे 30 जणांचा बळी गेला आहे. अशातचं कोरोना व्हायरसमुळे उत्तर प्रदेशातील एका गावाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गावात कोणताही नागरिक कोरोना बाधित नाही. परंतु, केवळ नावात साधार्म्य असल्यामुळे या गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यातील एका गावाचे नाव 'कोरौना' (Corona Village) असं आहे. देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर या गावातील नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या आहेत. या गावातील लोकांनी जेव्हापासून भारतात कोरोनाचा संसर्ग पसरला तेव्हापासून आमच्यासोबत भेदभाव करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: भारतात कोरोना व्हायरसमुळे 30 जणांचा बळी; देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1071 वर पोहचली)

प्राप्त माहितीनुसार, कोरौना गावात राहणाऱ्या एका गावकऱ्यांने सांगितले की, 'आमच्या गावात येण्यास कोणीही तयार नाही. जेव्हा आम्ही सांगतो की, आम्ही कोरौना गावाचे आहोत, त्यावेळी लोक आमच्यापासून दूर पळतात. 'कोरौना' हे केवळ गावाचे नाव आहे. आमच्या गावात आतापर्यंत कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही,' असंही या गावकऱ्याने म्हटलं आहे.