Representational Image (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशातील इंदौर शहरातून एक अतिशय भयानक घटना समोर आली आहे. इंदूरमध्ये दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तीन जणांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. कोरोना संसर्ग झाल्यानंतर महिलेला घरी अलग ठेवण्यात आले होते. या दरोडेखोरांनी 50 हजार रोख आणि दोन मोबाइलची चोरी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी सीसीटीव्हीच्या सहाय्याने तीनपैकी दोन आरोपींना अटक केली आहे, तर एक अद्याप फरार आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत.

पीडित महिलेने एसएसपी राजेश रघुवंशी यांना सांगितले की, कोरोनाची लागण झाल्यानंतर ती आपल्या घरात एकटीचं राहत होती. गुरुवारी रात्री 2 वाजता ती जागी झाली. तेव्हा तीन लोक तिच्या पलंगाजवळ उभे होते. दरोडेखोरांनी चाकू, कटर आणि कात्री दाखवत पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. महिलेने त्याला 50 हजार रुपये आणि दोन मोबाइल दिले. त्यानंतर तिघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. (वाचा - Bhopal: हृदय हेलावून टाकणारी घटना! भोपाळ येथील रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार; उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू)

कोरोनामुळे कमकुवत झाल्यामुळे पीडिता या तिघांचा प्रतिकार करू शकली नाही. हातात चाकू आणि कात्री असल्याने हत्येच्या भीतीने मी आवाज काढू शकला नाही, असेही पीडितेने सांगितले. घटनेनंतरही ही महिला पोलिसांकडे जाऊ नये म्हणून एका आरोपीने पहाटे पाच वाजेपर्यंत तिच्या घराचे रक्षण केले. सकाळी झाल्यानंतर तो तेथून पळून गेला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दरोडेखोरांना ओळखले. यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीपैकी एकाचे नाव दीपक असे असून तो महिलेच्या शेजारी राहत होता. त्याने या युवतीला एकटे पाहून दरोड्याचे नियोजन केले होते. दीपक अद्याप फरार आहे. तो 2 महिन्यांपूर्वी तुरूंगातून सुटला होता.