Robert Vadra, Priyanka Gandhi Vadra (PC - Instagram)

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी आज आपला आसाम दौरा रद्द केला आहे. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा (Robert Vadra) कोरोना पॉझिटिव्ह (COVID19 Positive) आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्यानंतर प्रियंका यांनी हा दौरा रद्द केला. स्वत: प्रियंका गांधी यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रियंका गांधी यांनी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. वड्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रियंका यांनी तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घेतली. मात्र, सुदैवाने प्रियंका यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु, डॉक्टरांनी त्यांना अलग राहण्याचा सल्ला दिला आहे. रॉबर्ट वड्रा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे.

त्यानंतर प्रियंका गांधींनी स्वत: ला अलग केले आहे. त्यांचा कोरोना अहवाल नकारात्मक आल्याचंही वड्रा यांनी म्हटलं आहे. परंतु डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी स्वत: ला अलग ठेवलं आहे. यामुळे प्रियंका यांच्या पुढील सभा तसेच मेळावे रद्द करण्यात आले आहेत. (वाचा - Assam: भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले EVM मशीन; काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी निवडणूक आयोगाकडे केली कारवाईची मागणी)

प्रियंका गांधी ट्विट - 

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटरमध्ये यासंदर्भात माहिती देताना म्हटलं आहे की, अलीकडेचं कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्याने मला माझा आसाम दौरा रद्द करावा लागत आहे. गुरुवारी माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी पुढचे काही दिवस क्वारंटाईन राहणार आहे. या गैरसोयीबद्दल मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते.