
5 नोव्हेंबरपासून केंद्र सरकारविरोधात (Central Government) आंदोलन करण्याचा निर्णय कॉंग्रेस (Congress) पक्षाने घेतला आहे. कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2 नोव्हेंबरला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. सर्व संघटनांच्या प्रमुखांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. सोनियाजी या बैठकीत देशव्यापी चळवळीच्या तयारीचा आढावा घेतील. त्यानंतर 5-15 नोव्हेंबर दरम्यान हे आंदोलन चालणार आहे. या आंदोलनात आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकरी संकट, सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक आणि क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी अशा मुद्द्यांवर भर देण्याचा विचार पक्षाने केला आहे.
याबाबत बोलताना कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, ब्लॉक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत 10 दिवस चालणाऱ्या या आंदोलनात नवी दिल्लीतील मोठ्या मेळाव्याचादेखील समावेश असेल. अशाप्रकारे निषेधासाठी कॉंग्रेस समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला होता. राहुल गांधींनी हे पद सोडल्यामुळे बहुतेक युवा कार्यकर्ते निराश झाले होते. आता स्वत: सोनिया गांधी पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकीकडे कॉंग्रेस देशभरात आंदोलन करण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी परदेश दौर्यावर गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी सोमवारी एक आठवड्याच्या दौऱ्यावर परदेशात गेले आहेत. 2 नोव्हेंबर रोजी ते बैठकीस उपस्थित राहणार नाहीत. मात्र याच आठवड्यात ते भारतात परत येतील आणि 5 नोव्हेंबरपासून ते कॉंग्रेसच्या देशव्यापी निषेधात सहभागी होतील.