HSC परिक्षेचा पेपर दरम्यान विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

हैद्राबाद (Hyderabad) येथे 12 वी (HSC) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा बोर्ड परिक्षेदरम्यान पेपर देताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानकपणे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने शिक्षण आणि उपस्थित विद्यार्थांना धक्का बसला. 16 वर्षीय गोपी राजू उत्तरपत्रिकेवर प्रश्नाचे उत्तर लिहित होता. मात्र त्यावेळी अचानकपणे पेपर लिहिता लिहिता खाली पडला. परंतु रुग्णालयात उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.

सिकंदराबाद येथील परिक्षा केंद्र चैत्यन येथील ही घटना आहे. अद्याप मृत्यूमागील कारण हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. तसेच मृत गोपी ह्याचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.येलारेड्डीगुडा क्षेत्रातील एका शासकीय विद्यालयात राजू 12 वीचे शिक्षण घेत होता.

पोलिसांकडून याबाबत अधिक तपासणी सुरु करण्यात आली आहे. तसेच रिपोर्टनुसार असे सांगितले जात आहे की, परिक्षेच्या पूर्वीपासूनच गोपी ह्याच्या छातीत दुखत असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र परिक्षेसाठी उपस्थिती लावणे महत्वाचे असल्याने त्याने परिक्षा केंद्रावर उपस्थिती लावली होती.