कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात गेल्या चार महिन्यापासून लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. लवकरचं अनलॉकच्या (Unlock 3.0) तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील सिनेमागृह (Cinema Theatres), जिम (Gym) पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
येत्या 31 जुलै रोजी 'अनलॉक 2' चा काळावधी संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात काही नवीन निर्बंध तसेच काही प्रमाणात शिथिलता देण्याची शक्यता आहे. चित्रपटगृह सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शिफारस केली आहे. त्यामुळे सिनेमा हॉल 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. (हेही वाचा - देशावरील कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी राम मंदिर भूमिपूजनापर्यंत दररोज 5 वेळा हनुमान चालिसाचं पठण करा; प्रज्ञासिंह ठाकूर यांचे जनतेला आवाहन)
दरम्यान, चित्रपटगृह चालकांनी 50 टक्के सीटच्या नियमानुसार, तयारी दर्शवली आहे. परंतु, सुरूवातीला 25 टक्के सीटवरचं प्रवेश दिला जावा आणि सोशल डिस्टन्सिगच्या नियमांचं पालन करण्यात यावं, असं केंद्रीय मंत्रालयाने म्हटलं आहे. (हेही वाचा - भारतात COVID19 चा रिकव्हरी रेट 63.92 टक्क्यांवर पोहचला; 36,145 रुग्णांची प्रकृती सुधारल्याची आरोग्य विभागाची माहिती)
अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात जीम आणि चित्रपटगृह सुरू होण्याची शक्यता असली, तरी शाळा आणि मेट्रो अजून काही काळ बंदचं राहण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी यापूर्वी पालकांकडून अभिप्राय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते.