कर्नाटक: कॅफे कॉफी डे चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू, नेत्रावती नदीत सापडला मृतदेह
V.G.Siddhartha (Photo Credits: Instagram)

मागील 36 तासांपासून बेपत्ता असलेले प्रसिद्ध कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day)चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ (V.G.Siddhartha) यांचा आज पहाटे मंगळुरूमधील नेत्रावती नदीत मृतदेह सापडला. सिद्धार्थ यांच्या घरी मंगळवारी सापडलेल्या पत्रात त्यांनी त्यांच्या आर्थिक संघर्षाविषयी लिहिले असून आपले बिझनेस मॉडेल अपयशी ठरल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सिद्धार्थ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वेनलॉक रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सोमवार संध्याकाळ पासून व्ही.जी. सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. हे शोधकार्य सुरु असताना मंगळुरूतील (Mangaluru) होजी बाजाराजवळ नेत्रावती नदीच्या पात्रात सकाळी ६.३० च्या सुमाराला कोणाचा तरी मृतदेह तरंगत असल्याची माहिती मंगळुरू पोलिसांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर तो मृतदेह व्ही.जी. सिद्धार्थ यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेली एक चिठ्ठी सापडली होती. त्यात त्यांनी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छळ झाल्याचा तसेच, कर्जदारांकडून असह्य दबाव असल्याचे म्हटले आहे. सिद्धार्थ यांच्यावरील कारवाई नियमांनुसारच असून, त्यांनी आपल्याकडे काळा पैसा असल्याची कबुली दिली होती, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा- कर्नाटक: माजी परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांचे जावई, CCD संस्थापक व्ही जी सिद्धार्थ बेपत्ता

सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले एस. एम. कृष्णा (S.M.Krishna) यांचे जावई आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यात कोटेपुरा परिसरात नेत्रावती नदीवरील एका पुलाच्या परिसरात सिद्धार्थ अखेरचे दिसले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.