Calcutta High Court, Birbhum Violence (PC -Wikimedia Commons and PTI)

Birbhum Violence: पश्चिम बंगालच्या बीरभूम (Birbhum) जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात 8 जणांना जिवंत जाळल्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी या घटनेची स्वत:हून दखल घेतली होती आणि मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे त्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार असून त्याच दिवशी सीबीआय आपला प्राथमिक अहवाल सादर करणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) सर्व कागदपत्रे आणि अटक केलेल्या व्यक्तींना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच न्यायालयाने एसआयटीला पुढील तपास न करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात टीएमसीचे पंचायत नेते भादू शेख यांच्यावर 4 बदमाशांनी बॉम्बने हल्ला केला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. यानंतर टीएमसी नेत्यांच्या एका गटाने परिसरात हिंसाचार सुरू केला. संशयाच्या आधारे अनेक घरांना आग लावण्यात आली. यात एकाच घरात 8 जणांना जिवंत जाळण्यात आलं. (हेही वाचा - Karnataka High Court On Marital Rape: लग्न म्हणजे पत्नीवर अत्याचार करण्याचा परवाना नाही, बळजबरीने लैंगिक संबंध हा बलात्कारचं; कर्नाटक उच्च न्यायालयाची टिप्पणी)

पीडितांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी रामपूरहाट गाठून पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आणि घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली. याशिवाय 10 पीडित कुटुंबांना नोकऱ्याही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.