Bus Driver Dies Of Cardiac Arrest: ओडिशामध्ये बस चालकाला आला हृदयविकाराचा झटका; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने थोडक्यात बचावले 48 प्रवाशांचे प्राण
Representative Image (Photo Credits: RawPixel)

Bus Driver Dies Of Cardiac Arrest: भुवनेश्वरला जाणाऱ्या बसमधील 48 प्रवासी थोडक्यात बचावले. बस चालवताना अचानक चालकाला हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला. मात्र, ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत बस एका भिंतीवर धडकवली. त्यामुळे बस थांबली आणि वाहनातील सर्व प्रवाशांचा जीव वाचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंधमाल जिल्ह्यातील पाबुरिया गावाजवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, बस चालक सना प्रधान यांना गाडी चालवताना छातीत दुखू लागले आणि त्यांचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. पुढे गाडी चालवता येणार नाही, हे त्याच्या लक्षात आले.

दरम्यान टिक्काबली पोलीस ठाण्याच्या प्रभारी कल्याणमयी सेंधा यांनी सांगितले की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळले. त्यानंतर वाहन थांबले आणि प्रवाशांचे प्राण वाचले. 'मां लक्ष्मी' ही खासगी बस साधारणत: दररोज रात्री कंधमालमधील सारंगढ येथून उदयगिरी मार्गे राज्याची राजधानी भुवनेश्वरला जाते. (हेही वाचा - Mumbai Accident News: युपीली मजूराचा रस्ता ओलांडताना अघतात मृत्यू, मद्यधुंद टॅक्सीचालकाला अटक

या घटनेनंतर चालकाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत घोषित केले. प्रधान यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.