गोवेकरांनो, तुमच्या साठी अत्यंत महत्वाची बातमी. गोवेकरांची न्याहारी ज्या पदार्थाशिवाय अधूरी आहे तो पाव आता महागणार आहे. येत्या 10 ऑक्टोबरपासून गोवेकरांना 5 रुपयाला पाव विकत घ्यावा लागणार आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, गोव्यात (Goa) काही दिवसांपूर्वीच ब्रेड स्लाईसच्या किंमतीतही 4 रुपयांनी वाढ झाली होती. त्यात आता भर म्हणजे पावही 4 रुपयाने 5 रुपयांवर जाणार आहे.
मैद्याच्या पिठाच्या आणि अन्य वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने आम्हाला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे अखिल गोवा बेकर्स संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी बुधवारी स्पष्ट केले. पावाची किंमत नियंत्रित ठेवण्यासाठी गोवा सरकारने आम्हाला काही सवलती द्याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत आहे असेही ते म्हणाले.
गोव्यात बहुतांश गोवेकरी हा बेकरीचा व्यवसाय करतात. मात्र महागाईत हा व्यवसाय करणे त्यांना परवडत नाही. सरकारने बेकरीवाल्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून त्यातच पिठाच्या किंमती वाढणे म्हणजे बेकरीचा व्यवसाय करणा-यांसाठी दुष्काळात तेरावा असेच आहे.
हेही वाचा- गोव्यात होणार 'Nude Party'? शेअर केलेल्या पोस्टने सोशल मिडियावर खळबळ
या व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी सरकारने सवलती द्याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच जर सरकारने आम्हाला काही सवलती दिल्या तर पावाची किंमत आम्ही नियंत्रणात आणू शकतो. यासाठी आम्ही गोवा सरकारला 10 ऑक्टोबरपर्यंत मुदत देत आहोत असेही त्यांनी सांगितले आहेत.
अखिल गोवा बेकर्स संघटनेने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण गोवा संघटनेचे उपाध्यक्ष शेखर सावर्डेकरही उपस्थित होते.