Delhi: Police | (Photo Credits: ANI)

Delhi's Tihar Jail Recieved Bomb Threat: राजधानी दिल्लीत चाललयं तरी काय? असा प्रश्न आता सर्वांनाचं पडत आहे. कारण गेल्या पंधरवाड्यापासून दिल्लीतील शाळा, रुग्णालये आणि विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb Threat) देणारे ईमेल प्राप्त होत आहे. अशातचं आता दिल्लीच्या तिहार तुरुंगाला (Delhi's Tihar Jail) मंगळवारी बॉम्बची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. शहरातील शाळा, रुग्णालये आणि अगदी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरही अशाच प्रकारचे इशारे पाठवण्यात आले होते.

तुरुंग प्रशासनाने या धमकीबद्दल दिल्ली पोलिसांना सतर्क केले आहे. या तुरुंगात प्रमुख राजकारण्यांसह काही हाय-प्रोफाइल कैदी आहेत. त्यामुळे याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोमवारी, राष्ट्रीय राजधानीतील चार रुग्णालयांना ईमेलवर बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीटीबी हॉस्पिटल, दादा देव हॉस्पिटल, हेडगेवार हॉस्पिटल आणि दीप चंद्र बंधू हॉस्पिटलमधून बॉम्बच्या धमकी मिळाल्याचा फोन आला होता. मात्र, आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. बॉम्ब निकामी पथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी शोध घेण्यासाठी या रुग्णालयांमध्ये तपासणी केली होती. (हेही वाचा -Delhi Hospitals Receive Bomb Threat Calls: दिल्लीतील 4 रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर)

हेडगेवार रुग्णालयाचे सुरक्षा अधिकारी व्ही के शर्मा म्हणाले, पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक तपास करत आहेत. आम्ही दोन वेळा तपासणी देखील केली आहे. आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. गेल्या महिनाभरात शाळा, रुग्णालये आणि विमानतळासह विविध ठिकाणी अशा धमक्या येण्याची ही चौथी वेळ आहे. दरम्यान, राजधानी शहरातील तब्बल 20 रुग्णालयांना 12 मे (रविवार) रोजी अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्याच दिवशी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (IGI) बॉम्बची धमकी देणारा ईमेलही मिळाला होता. मात्र, या सर्व धमक्या फसव्या ठरल्या.

याशिवाय, 1 मे रोजी दिल्लीतील सुमारे 100 शाळा, नोएडामधील दोन आणि लखनऊमधील एका शाळांना बॉम्बच्या धमक्याही पाठवण्यात आल्या होत्या, त्या देखील फसव्या ठरल्या. रशियन ईमेल सेवा वापरून शाळांना या धमक्या पाठवण्यात आल्या होत्या. तथापी, राजस्थानमधील जयपूर आणि उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील शाळांनाही अशाच धमक्या प्राप्त झाल्या होत्या.