Uttar Pradesh Shocking: भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाचे तरूणीसोबत धक्कादायक कृत्य, उत्तर प्रदेश येथील घटना
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

नागरिकांचा काळ्या जादूवरचा विश्वास नष्ट करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अनेक अंधश्रद्धा निर्मलून संस्था देशात कार्यरत आहेत. मात्र, तरीही अनेकजण अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. याचपार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) बदायूतील (Badaun) उझानी (Ujhani) भागात खळबळजनक घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या तरूणीला भूतबाधा झाल्याचे सांगत एका मांत्रिकाने तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मांत्रिक हा उझानी येथील एका मंदिरात असायचा. या मंदिरात परिसरात राहणाऱ्या लोकांचे येण-जाणे होते. दरम्यान, या मांत्रिकाने मंदिरात आलेल्या एका महिलेला तिच्या मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगितले. तसेच यातून तिची सुटका करतो, असेही आश्वासन मांत्रिकाने त्या महिलेला दिले. त्यानुसार, मांत्रिक गुरुवारी या महिलेच्या घरी गेला आणि कुटुंबातील सर्वांना दिलेला धागा गळ्यात घालायला सांगितला. त्यानंतर मांत्रिकाने भूत पळवण्यासाठी तरूणीच्या चेहऱ्यावर गरम चिमट्याने चटके दिले. ज्यामुळे मुलीचा चेहरा खूप जास्त विद्रुप झाला आहे. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठले आणि त्यांच्या मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करीत आहे. हे देखील वाचा- Delhi: पत्नीच्या प्रियकाराने केली नवऱ्याची हत्या, नाल्यात शव फेकल्यानंतर टॅटूमुळे झाला घटनेचा उलगडा

मिळालेल्या माहितीनुसार, मांत्रिकाने सात दिवसांपूर्वी पीडित कुटुंबाला घाबरवले होते. तसेच लवकर यावर उपचार केले नाहीत तर, तुमच्या मुलीचा मृत्यू होईल असेही त्याने सांगितले. मुलीसाठी कुटुंबीय हा सर्व प्रकार करायला तयार झाले. त्यांनी पूजेच्या साहित्यासह 500 रुपयेही मांत्रिकाला दिल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.