भाजप खासदार निशिकांत दुबे (Photo Credit: Facebook)

राजकीय नेत्यांची आपल्यावर मर्जी राहावी यासाठी करण्यात येणाऱ्या ‘हुजरेगिरी’चे प्रकार आपण नेहमीच पाहत असतो. मात्र नेत्यांचा हात आपल्या डोक्यावर असावा म्हणून कार्यकर्ते कोणत्याही थराला जाऊ शकतात याचे एक उदाहरण नुकतेच झारखंडमध्ये दिसून आले.

झारखंड येथील गोड्डा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे हे त्यांच्याच मतदारसंघातील एका पूलाच्या बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थिती राहिले होते. यावेळी पंकज साह या भाजपा कार्यकर्त्याने खासदारांचे चक्क ताटात पाय धुतले, इतकेच नाही तर ते पाय स्वतः कपड्याने कोरडे करून तीर्थ प्राशन करतात तसे ते पाय धुतलेले पाणी या कार्यकर्त्याने प्राशन केले.

या प्रकारामध्ये निशिकांत दुबे यांनी त्या कार्यकर्त्याला थांबवणे आवश्यक होते मात्र त्यांनी तसे केले नाही, उलट त्यांनी तो फोटो आपल्या सोशल मिडियावर पब्लिश केला. आजही भारताच्या राजकारणात असले धक्कादायक प्रकार होत असलेले पाहून चोहोबाजूंनी खासदारांवर टीकेची झोड उठत आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना खासदार म्हणतात, “स्वतःचा आनंद व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्याने पाय धुतले तर काय इतके मोठे आकाश कोसळले, झारखंडमध्ये आजही पाहुण्यांचे पाय धुतले जातात. पाहुण्याचे पाय धुणे चुकीचे आहे का ? तुम्ही तुमच्या पूर्वजांना विचारा, महाभारतात कृष्णाने पाय धुतले नव्हते का ?” असे प्रश्न निशिकांत दुबे यांनी विचारले आहेत.