भारतात 14 राज्यात Bird Flu चा कहर; लाल किल्ल्यात मृत सापडलेल्या 15 कावळ्यांना संक्रमण, 26 जानेवारीपर्यंत प्रवेश बंदी
कावळा I प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: Pixabay)

देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा (Avian Influenza) संसर्ग वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, दिल्लीच्या लाल किल्ल्यात (Red Fort) मृत सापडलेल्या 15 कावळ्यांच्या नमुन्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत 14 राज्यात बर्ड फ्लूच्या कहरामुळे हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने सांगितले की सोमवारपर्यंत पाच राज्यांत कोंबड्यांमध्ये आणि नऊ राज्यांत कावळ / स्थलांतरित / वन्य पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझाच्या संसर्गाची पुष्टी झाली. त्याशिवाय नवी दिल्लीतील तीस हजारी भागात मृत बगळे आणि लाल किल्ल्यातील मृत कावळ्यांच्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी दिल्ली सरकारला सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात आरआरटी ​​तैनात करण्यात आले असून सर्व बाधित उपकेंद्रांमध्ये कोंबड्यांचे कुलिंग सुरू आहे. कुलिंग ऑपरेशनचे कार्य सीपीडीओ, मुंबई येथे पूर्ण झाले असून तेथे साफसफाई व निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील केद्रेंवाडी, अहमदपूर, सुकणी व वज्रवाडी गावात व औसा तालुक्यातील कुर्दवाडी गावात कुलिंग व स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे. (वाचा - Bird Flu Update: भारतात कोरोना महामारी दरम्यान 'बर्ड फ्लू'मुळे दहशत; 'या' राज्यात अलर्ट)

याशिवाय मध्य प्रदेशातील हरदा आणि मंदसौर जिल्ह्यात आणि छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यात आरआरटी ​​तैनात करण्यात आल्या आहेत. हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील उपकेंद्रांमध्ये कोंबड्यांचे कुलिंग करण्याचे काम चालू आहे.

देशातील बाधित भागाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या केंद्रीय पथकाने बाधित स्थळांना भेट दिली आहे. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी या पथकाने महाराष्ट्र दौरा केला आणि साथीचा अभ्यास केला आहे. ट्विटर, फेसबुक हँडल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध मंचांवर बर्ड फ्लूविषयी जनजागृती करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे.