Bank Strike (फोटो सौैजन्य - PTI)

Bank Strike: युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या बॅनरखाली 9 संघटनांनी सोमवार, 15 मार्चपासून दोन दिवसांच्या बँक संपाची हाक दिली आहे. दोन सरकारी बँकांच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या विरोधात संघटनांनी हा संप पुकारला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (AIBEA) सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी दावा केला की, सुमारे 10 लाख कर्मचारी आणि बँक अधिकारी या संपात सहभागी होतील. 15 आणि 16 मार्च रोजी हा संप असणार असून अनेक बँकांचे कामकाज या कालावधीत ठप्प असणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), कॅनरा बँक यासह अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना शाखा आणि कार्यालयाच्या सेवा प्रभावित होण्यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रस्तावित संपाच्या दिवसांमध्ये कार्यालये आणि बँक शाखांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत असल्याचेही बँकांनी नमूद केले आहे. (वाचा - SBI Alert: भारतीय स्टेट बँकेची UPI सेवा आज काही काळासाठी स्थगित; वाचा सविस्तर)

दरम्यान, गेल्या महिन्यात सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्गुंतवणुकीच्या योजनेचा भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. या दोन्ही बँकांचे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये खाजगीकरण केले जाईल. यापूर्वी सरकारने सन 2019 मध्ये आयडीबीआय बँकेतील बहुतांश हिस्सा एलआयसीकडे विकून त्याचे खासगीकरण केले होते. तसेच, सरकारने गेल्या चार वर्षांत 14 सरकारी मालकीच्या बँकांचे विलीनीकरण केले आहे.

दोन दिवशीय संपात 'या' संस्था घेणार भाग -

यूएफबीयूच्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (All India Bank Employees Association-AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फेडरेशन (All India Bank Officers Confederation -AIBOC), नॅशनल कन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (National Confederation of Bank Employees -NCBE), ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन All India Bank Officers Association -AIBOA) आणि एम्प्लॉईज कन्फेडरेशन ऑफ इंडिया (Bank Employees Confederation of India -BEFI) यांचा समावेश आहे. याशिवाय INBEF, INBOC, NOBW आणि NOBO या संघटनांचादेखील या संपामध्ये समावेश असणार आहे.