रामदेव बाबा (Photo credits: Twitter/YogrishiRamdev)

एफएमसीजी उत्पादनांमुळे बाजारात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर, आता योगगुरु बाबा रामदेव यांनी रेडीमेड कपड्यांद्वारे आपले वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी कपड्यांचे दुकान 'पतंजलि परिधान' सुरु केले आहे. म्हणजेच आता पतंजलि कापड उत्पादन उद्योगामध्येही उतरली आहे. दिल्लीमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर रामदेव बाबांनी या शोरूमचे उद्घाटन केले. तसेच यासोबत तीन नवे ब्रँँड, लिव्हफिट (LiveFit), आस्था (Astha) आणि संस्कार (Sanskar)देखील बाजारात आणले आहेत.  कंपनीचे म्हणणे आहे की या ‘पतंजलि परिधान’ रिटेल स्टोअरमध्ये बाहेरच्या महागड्या कपड्यांच्या तुलनेत स्वस्त दराने डिझाईनर कपडे मिळतील.

दिल्लीच्या नेताजी सुभाष प्लेस या ठिकाणी पतंजलिचे हे तयार कपड्यांचे मोठे स्टोअर सूरू झाले असून, याच्या उद्घाटन प्रसंगी मधुर भांडारकर आणि पैलवान सुशील कुमारदेखील उपस्थित होते. याप्रसंगी रामदेव बाबांनी आगामी काळात देशभरात 25 नवे स्टोअर सुरु करणार असल्याची घोषणा केली.

‘पतंजलि परिधान’मध्ये पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांसाठी पोशाखांचे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. या स्टोअरच्या मार्फत 3000 पेक्षा जास्त वेगवेगळी उत्पादने पतंजलि परिधानने बाजारात आणली आहेत. याचसोबत इथे विविध एक्सेसिरीज, आभूषणे आणि पाश्चात्य पोशाखदेखील उपलब्ध असणार आहेत. पतंजलि परिधानात आधुनिक ते पारंपरिक सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातील पतंजलि जीन्स हे खास आकर्षण असणार आहे. सध्या दिवाळीच्या कालावधीत बाहेर सात हजार रुपयांना मिळणारे कपडे पतंजलि स्टोअरमध्ये 1100 रुपयांना मिळणार आहेत.

खादीद्वारे ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढा पुढे नेण्यात आला त्याप्रमाणेच ‘पतंजलि परिधान’द्वारे देशाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले जाणार आहे, असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे.