Kisan Andolan: किसान आंदोलनातील आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू; आतापर्यंत 5 शेतकऱ्यांना गमवावा लागला जीव
Farmer dies in Kisan Andolan (PC - X/@Fulara_Parkash)

Kisan Andolan: शेतकरी आनंदोलनाच्या (Kisan Andolan) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब (Panjab) च्या खनौरी सीमेवर (Khanuri Border) आणखी एका शेतकरी आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. दर्शन सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून ते 62 वर्षांचे होते. 13 फेब्रुवारीपासून 'दिल्ली चलो' (Delhi Chalo) मोर्चाच्या आवाहनानंतर आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दर्शन सिंह हे भटिंडा जिल्ह्यातील अमरगढ गावचे रहिवासी होते. ते 13 फेब्रुवारीपासून खनौरी सीमेवर आंदोलन करत होते. त्यांच्या कुटुंबाकडे 8 एकर जमीन आहे.

दर्शन सिंह यांच्यावर आठ लाख रुपयांचे कर्ज होते, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी महिन्याभरापूर्वीच मुलाचे लग्न केले होते. दर्शन सिंह यांच्या निधनावर भारतीय किसान युनियन एकता सिद्धुपूरने शोक व्यक्त केला आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस रेशम सिंग म्हणाले की, सीमेवर शेतकऱ्यांचा मृत्यू थांबवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. (हेही वाचा -Kisan Andolan 2.0: शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या 65 वर्षीय शेतकऱ्याचा शंभू सीमेवर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन सिंह यांची गुरुवारी रात्री तब्येत खराब होती. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, दर्शन सिंह रात्री 11 वाजता आंदोलनस्थळी बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं. त्यानंतर त्यांना पतियाळा येथील सरकारी राजेंद्र रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Farmers Protest: शेतकरी आंदोलनात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, हरियाणा सीमेवर अनेक जण जखमी)

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पोलिसांनी अंबाला येण्या-जाण्याचे सर्व छोटे-मोठे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ते बंद झाल्यामुळे पंजाब आणि हिमाचलमधील भाजीपालाही अंबालापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे भाजीपाला बाजारावर मोठा परिणाम होत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवरही झाला आहे.