Akhilesh Yadav (PC - PTI)

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीसंदर्भातील (Birth Anniversary) एका ट्विटमुळे ट्रोल होत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी समाजवादी पक्षाकडून 'दलित दिवाळी' साजरी करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आलं आहे. या ट्विटनंतर अखिलेश यादव यांना सोशल मीडियावर नेटीझन्सकडून ट्रोल करण्यात येत आहे. सध्या ट्विटरवर #Shame_On_You_AkhileshYadav हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

अखिलेश यादव यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, भाजपाच्या राजकीय आमवस्या काळात संविधान धोक्यात आहे. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेबांनी देशाला नवी प्रकाशवाट दिली. त्यामुळेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी समाजवादी पक्षातर्फे उत्तर प्रदेश, देश आणि विदेशात 'दलित दिवाळी' साजरी करण्याचे आव्हान करण्यात येत आहे. (वाचा - CBI probe Against Anil Deshmukh: सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांना दिलासा नाही; माजी गृहमंत्र्यांसह राज्य सरकारची याचिकाही फेटाळली)

अखिलेश यादव यांच्या या ट्विटनंतर नेटीझन्सनी त्यांना ट्रोल केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते. त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी लढा दिला, असं म्हणत नेटीझन्सनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊटवरून अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीविषयी निश्चितच अखिलेश यांना काही माहिती नाही. बाबासाहेब आयुष्यभर जातिव्यवस्था आणि अस्मितेच्या राजकारणाविरोधात लढले. परंतु, एका विशिष्ट समुदायाला संघटीत करण्यासाठी अखिलेश यांच्याकडून बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग होत आहे. दलितांना मूर्ख बनवण्याऐवजी त्यांच्या उत्कर्षासाठी काम करा, असा सल्ला विनय तेंडुलकर यांनी दिला आहे.